तहसील कार्यालयामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन; आरोग्य शिबिर, विद्यार्थी सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रमांसह जनजागृतीवर भर
शहादा, दि. १२ नोव्हेंबर : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त तसेच जनजातीय गौरव दिनाचे औचित्य साधून शहादा तहसील कार्यालयाच्या वतीने ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती तहसीलदार संभाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी
यावेळी तहसीलदार संभाजीराव पाटील म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, जल, जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांचे संघर्षमय जीवन आणि समाजसुधारणेचे कार्य संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. नव्या पिढीपर्यंत त्यांचे विचार आणि कार्य पोहोचावे, या उद्देशाने शासनाच्या निर्देशानुसार हा सेवा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे.
सप्ताहातील विविध उपक्रमांचे नियोजन
या सप्ताहांतर्गत पुढीलप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
- १३ नोव्हेंबर : न्यूक्लियस बजेट योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना धनादेशांचे वितरण.
- १४ नोव्हेंबर : आदिवासी स्मारके आणि महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता व देखभाल तसेच सायंकाळी दीपोत्सव.
- १५ नोव्हेंबर : भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त मुख्य शासकीय कार्यक्रम, प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन.
- १६ नोव्हेंबर : आधार कार्ड व शासकीय कागदपत्रांसाठी सेवा शिबिर, वनपट्टेधारकांना विविध लाभांचे वाटप तसेच कृषी विभागाच्या ऑनलाइन सेवा, शेतकरी नोंदणी, पीक विमा आणि अनुदान योजनांबाबत मार्गदर्शन.
- १७ नोव्हेंबर : आरोग्य व पोषण जनजागृती अभियानांतर्गत विशेष आरोग्य तपासणी शिबिर.
- १८ नोव्हेंबर : आदिवासी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण दिन आणि सेवा सप्ताहाचा सांगता समारंभ.
आदिवासी बहुल भागांतही विशेष कार्यक्रम
शहादा तालुक्यातील म्हसावद, ब्राह्मणपुरी, असलोद आणि मंदाणे या आदिवासी बहुल मंडळ स्तरावरही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये जनजातीय स्वाभिमान संमेलन, क्रीडा स्पर्धा, आदिवासी सांस्कृतिक परंपरा व इतिहास दर्शविणाऱ्या शोभायात्रा, लोककला, लोकनृत्य, लोकगीते, साहित्य प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक मेळाव्यांचा समावेश आहे.
या उपक्रमांच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक योगदान जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेला नायब तहसीलदार शिरीष परदेशी आणि वरिष्ठ लिपिक जगदीश मराठे उपस्थित होते. जनजातीय गौरव सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांची माहिती आणि लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.










