डॉ. सुजय विखे पाटील अध्यक्षपदी, तर रणजितसिंह देशमुख उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
पारनेर | प्रतिनिधी :
जिल्ह्याच्या राजकारणातील विविध राजकीय प्रवाहांना एकत्र आणत सहकाराच्या माध्यमातून नवी राजकीय समीकरणे घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी, तर रणजितसिंह देशमुख यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी ही निवड प्रक्रिया पार पडली.
राजकीय समन्वयातून सहकार विकास आघाडीची ताकद
या निवडीच्या प्रक्रियेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख आणि सभापती प्रा. राम शिंदे यांच्यातील समन्वय महत्त्वाचा ठरला. विखे, थोरात आणि गडाख यांच्या सहमतीतून १७ जागांवर विजय मिळविण्यात आला. संजीवनी शिंदे यांच्या पाठिंब्यामुळे आघाडीचे संख्याबळ १८ वर पोहोचले. आजच्या बैठकीत सचिन घुमरे आणि ज्योती प्रकाश शिंदे यांनीही पाठिंबा दिल्याने निवडीचा मार्ग मोकळा झाला.
डॉ. सुजय विखे पाटील यांचा सहकार क्षेत्रातील अनुभव महत्त्वाचा
डॉ. सुजय विखे पाटील यांना सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. सहकारी साखर कारखान्यांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांना सहकारी संस्थांचे व्यवस्थापन, सभासदांचे प्रश्न, शेतकऱ्यांशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि संस्थात्मक कामकाजाचा अनुभव मिळाला आहे. आता जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहकारी वित्तीय संस्थेचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे.
जिल्हा बँकेसमोर अनेक आव्हाने
नव्या नेतृत्वासमोर शेतकऱ्यांना वेळेत कर्जपुरवठा करणे, पीककर्ज वितरण सुरळीत ठेवणे, थकबाकीचे प्रश्न सोडविणे, आर्थिक शिस्त राखणे आणि सहकारी संस्थांना अधिक सक्षम करणे अशी अनेक आव्हाने आहेत. यासोबतच आधुनिक बँकिंग सुविधांचा विस्तार करून ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार अधिक सुलभ करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
रणजितसिंह देशमुख यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी
सहकार विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध राजकीय नेतृत्वांना एकत्र आणण्यात डॉ. सुजय विखे पाटील यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला. या राजकीय समन्वयातून रणजितसिंह देशमुख यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली.
अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे पाटील आणि उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची बिनविरोध निवड झाल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नेतृत्वात नवे पर्व सुरू झाले आहे. राजकीय समन्वयासोबतच शेतकऱ्यांचे हित, बँकेचे आर्थिक व्यवस्थापन आणि सहकारी संस्थांचे प्रश्न सोडविण्यात हे नवे नेतृत्व कितपत यशस्वी ठरते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










