खासदार ज्योतीताई वाघमारे व शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप; शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी फराळाचा आपुलकीचा क्षण
औराद, प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद व परिसरातील गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आनंदाचा शिधा वाटप उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन शेतकरी, शेतमजूर आणि माता-भगिनींना दिवाळीच्या शिध्याचे वाटप करण्यात आले. लोकप्रिय खासदार ज्योतीताई वाघमारे आणि सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाला माणुसकी आणि आपुलकीचा सुंदर स्पर्श लाभला. औराद येथील गंगाधर लोहार यांच्या शेतकरी कुटुंबासोबत दिवाळीचा फराळ करण्याचा आनंददायी क्षण यावेळी अनुभवता आला. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने लोहार कुटुंबाला दिवाळी फराळासोबत नवीन साडी आणि कपड्यांची भेट देण्यात आली. या भेटीमुळे कुटुंबीयांच्या आनंदात भर पडली.
संकटाच्या काळात बांधावर पोहोचली मदतीची साथ
यावेळी उपस्थित महिला भगिनींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. संकटाच्या काळात आपली विचारपूस करणारे आणि मदतीसाठी थेट शेताच्या बांधावर येणारे हात आपल्या पाठीशी आहेत, ही भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती.
दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकरी व शेतमजूर कुटुंबांशी थेट संवाद साधून त्यांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडविणारा ठरला.
यावेळी सोलापूरचे नगरसेवक प्रियदर्शन भैया साठे, पंचायत समिती सदस्य प्रियांकाताई कुपसंगे, शिवसेनेचे पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ आणि शिवसैनिक उपस्थित होते.











