ओव्हरहेड वायरमध्ये वीजपुरवठा सुरू करण्याची तयारी; तांत्रिक तपासणी आणि लोकल ट्रेनच्या चाचण्यांचा मार्ग मोकळा होणार
नवी मुंबई | प्रतिनिधी :
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेत आणखी एका नव्या कॉरिडॉरची भर पडण्याच्या दिशेने काम वेगाने सुरू आहे. पनवेल ते कर्जतदरम्यान उभारण्यात येत असलेल्या २९.६ किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वेमार्गावर १५ डिसेंबर २०२६ पासून ओव्हरहेड वायरमध्ये वीजपुरवठा सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) याबाबत माहिती दिली आहे.
वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर या मार्गावर तांत्रिक तपासणी आणि लोकल ट्रेनच्या चाचण्या घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, प्रवासी सेवा सुरू करण्यापूर्वी आवश्यक सुरक्षा तपासण्या पूर्ण करणे आणि रेल्वेची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.
पनवेल-कर्जत हा नवा रेल्वे कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर या दोन्ही शहरांदरम्यान थेट उपनगरीय रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. सध्या या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक अंतराचा प्रवास करावा लागतो. नवीन रेल्वेमार्गामुळे प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून कल्याण रेल्वेमार्गावरील गर्दी आणि प्रवाशांचा ताण कमी होण्यासही मदत होण्याची अपेक्षा आहे.
नव्या रेल्वेमार्गावर पाच स्थानके
पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉरचा प्रकल्प सुमारे २ हजार ७८२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत आहे. या मार्गावर एकूण पाच स्थानकांचा समावेश असेल.
१. पनवेल
२. चिखले
३. मोहोपे
४. चौक
५. कर्जत
या रेल्वेमार्गावर तीन बोगदे बांधण्यात आले आहेत. त्यापैकी वावर्ले गावाजवळील २.६ किलोमीटर लांबीचा बोगदा विशेष महत्त्वाचा आहे. याशिवाय रेल्वे फ्लायओव्हर, मोठे पूल आणि छोटे पूलही उभारण्यात आले आहेत.
एमआरव्हीसीकडून १५ डिसेंबरपासून किंवा त्यानंतर नव्या रेल्वेमार्गाच्या अप आणि डाउन ट्रॅकसह रेल्वे सायडिंग व संबंधित अन्य ट्रॅकवरही वीजपुरवठा सुरू केला जाणार आहे. त्यानंतर रेल्वे अधिकारी वीज यंत्रणा, सिग्नलिंग आणि इतर तांत्रिक सुविधांची तपासणी करतील. पुढील टप्प्यात या मार्गावर रेल्वेगाड्या चालवून चाचण्या घेतल्या जातील. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण होऊन आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतरच या मार्गावर प्रवासी लोकल सेवा सुरू होऊ शकणार आहे.
ओव्हरहेड वायरमध्ये वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर रेल्वे रुळांजवळ राहणाऱ्या नागरिकांनी तसेच त्या परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. वीजवाहक तारांना आणि संबंधित उपकरणांना स्पर्श करू नये. या तारांमध्ये नेहमीच वीजप्रवाह सुरू असल्याचे गृहीत धरावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, हा नवा रेल्वे कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर पनवेल, नवी मुंबई, कर्जत आणि आसपासच्या वेगाने विकसित होत असलेल्या भागांची रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो.









