ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत कथा आणि कीर्तन सेवांनी सप्ताह रंगला; पंचक्रोशीतील भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग
हेळंब | प्रतिनिधी :
हेळंब, ता. देवणी, जि. लातूर येथील श्री नागाबुवा मठ संस्थान येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, महावैष्णव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्रीमद् भागवत कथा भक्तिमय वातावरणात मोठ्या थाटामाटात संपन्न झाली.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भावार्थ रामायण ग्रंथ समाप्तीच्या निमित्ताने तसेच श्री संत नामदेव महाराज आणि श्री गुरुनानक जयंती पर्वाचे औचित्य साधून या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. श्री महंत सुरत गिरजी महाराज यांच्या कृपा-आशीर्वादाने आणि श्री युत भिंगोलीकर महाराज यांच्या प्रेरणेने १७ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा सप्ताह पार पडला.
सप्ताहात व्यासपीठ अधिकारी म्हणून ह.भ.प. आत्माराम महाराज आळंदीकर आणि ह.भ.प. रघुवीर महाराज हेळंबकर यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच श्रीमद् भागवत कथाकार म्हणून ह.भ.प. रघुवीरजी महाराज यांनी भागवत कथा सादर केली.
या सप्ताहादरम्यान ह.भ.प. जनक अण्णा महाराज अपशिंगेकर, ह.भ.प. भरत महाराज भिंगोलीकर, ह.भ.प. महेश महाराज माकणीकर, ह.भ.प. देविदास महाराज निवळीकर, ह.भ.प. नितीन महाराज हिप्परगेकर, ह.भ.प. भाऊसाहेब महाराज धांडे (बीड), गुरुवर्य यशोधन किशन महाराज साखरे (आळंदी देवाची) आणि ह.भ.प. अवधूत महाराज एकांबेकर (भालकी) यांनी कीर्तन सेवा केली. सप्ताहाच्या सांगतेनिमित्त काल्याचे कीर्तन ह.भ.प. रघुवीरजी महाराज हेळंबकर यांनी केले.
यावेळी पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळांसह नेताजी गुरुजी यांच्या संस्थेतील बाल भजनी मंडळानेही सहभाग नोंदविला. अखंड हरिनाम, कीर्तन आणि भक्तिरसपूर्ण वातावरणात हा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा झाला.










