सुमारे ३८ अतिक्रमणधारकांना बजावल्या होत्या नोटिसा; नगरपरिषद आणि पोलिसांच्या बंदोबस्तात दिवसभर कारवाई
कुरुंदवाड | प्रतिनिधी :
शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहरातील मुख्य रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड नगरपरिषदेने बुधवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. नवबाग रोड ते शिवतीर्थापर्यंतच्या मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात आल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून वाहतुकीचा अडथळा काही प्रमाणात दूर होण्यास मदत झाली आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.
बसवेश्वर चौक, ईगल चौक, सरकारी दवाखाना आणि नवबाग रोड चौक परिसरातील सुमारे ३८ अतिक्रमणधारकांना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी नोटिसा बजावल्या होत्या. बसवेश्वर चौक ते नवबाग रोड हा शहरातील अत्यंत गजबजलेला मुख्य रस्ता असून या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली.
कारवाईदरम्यान काही छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी स्वतःहून पानटपऱ्या, हातगाड्या आणि खोकी हटवून घेतली. ज्यांनी अतिक्रमणे स्वतःहून काढली नाहीत, तेथे नगरपरिषदेच्या पथकाने ती हटविण्याची कार्यवाही केली. सुरुवातीला काही अतिक्रमणधारक आणि प्रशासन यांच्यात वादावादी झाली. मात्र, अधिकारी आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर कारवाई पुढे सुरू ठेवण्यात आली.
मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या नगररचना विभागाने ही मोहीम राबवली. कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या वतीने शितलकुमार डोईजड यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. बांधकाम अभियंता राजेंद्र गवळी, नगररचना अधिकारी विराज थोरात यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी सकाळी ११ वाजल्यापासून कारवाईत सहभागी झाले होते.
सकाळी सुरू झालेली अतिक्रमण हटाव मोहीम सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरू होती. काही दिवसांपूर्वी अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावून अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. या मोहिमेमुळे अरुंद झालेल्या रस्त्यांचा काही भाग मोकळा झाला असून वाहतुकीसाठी अधिक जागा उपलब्ध झाली आहे.










