बीड येथील मैत्रा फाउंडेशनचा सन्मान; शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल
रांजणगाव गणपती | प्रतिनिधी :
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रांजणगाव गणपती येथे कार्यरत असलेले आदर्श शिक्षक श्री. संजयकुमार ताराबाई पोपटराव वाळके यांना मैत्रा फाउंडेशन, बीड (महाराष्ट्र) यांच्या वतीने ‘शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक’ हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी शिरूर तालुक्यातील संतोष जाधव यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विवेक वाहिनीच्या कार्यवाह प्राचार्य डॉ. सविता शेटे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी दिलीप ख्रिस्ती, गेवराईचे विस्तार अधिकारी प्रवीण काळम, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या डॉ. कविता गीते, शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष विजय खोसे, मधुकर सानप, गोविंद वायकर आणि मैत्रा फाउंडेशनचे संस्थापक द. ल. वारे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहून विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविणारे श्री. संजयकुमार वाळके यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या या कार्याची यापूर्वीही विविध संस्थांनी दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
यामध्ये पुणे जिल्हा नेहरू युवा केंद्राचा जिल्हा युवा पुरस्कार, संपर्क फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सलग दोन वर्षे मिळालेला ‘टॉप टीचर अवॉर्ड’, महाराष्ट्र राज्य शिक्षण समितीच्या शिरूर शाखेचा ‘छत्रपती संभाजी महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार’ तसेच जिजामाता बहुउद्देशीय संस्था, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर यांचा ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ यांचा समावेश आहे.
वाळके यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे रांजणगाव गणपती शाळेच्या शैक्षणिक कार्याचाही गौरव झाला आहे. त्यांच्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पळसकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रतिभा बत्ते, उपाध्यक्ष अक्षय गलांडे, केंद्रप्रमुख तानाजी पाटील, गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रीतम कोकणे, पंचायत समिती सदस्य सागर दादा देवकर, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तथा महागणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर, सरपंच सुवर्णा वायदंडे आणि उपसरपंच शिंदे ताई यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.










