भाजप आमदार अमोल जावळे व नगराध्यक्षा दामिनी सराफ यांच्या हस्ते रथपूजन; १७८ वर्षांची परंपरा कायम
फैजपूर, ता. यावल
जय जय रामकृष्ण हरी! जय हरी विठ्ठल! जय हरी विठ्ठल! अशा भक्तिमय जयघोषात फैजपूर येथील श्री संत खुशाल महाराज देवस्थानचा स्वयंभू भगवान पांडुरंग रथोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार अमोल हरीभाऊ जावळे आणि फैजपूरच्या नगराध्यक्षा सौ. दामिनी पवन सराफ यांच्या हस्ते स्वयंभू भगवान पांडुरंग रथाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भक्तिमय वातावरणात रथाची मिरवणूक काढण्यात आली.
फैजपूर येथील श्री संत खुशाल महाराज देवस्थानच्या वतीने गेल्या १७८ वर्षांपासून ही रथोत्सवाची परंपरा जपली जात आहे. यंदाही उत्सवानिमित्त भजन, कीर्तन, प्रवचन यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
स्वयंभू भगवान पांडुरंग रथोत्सवाची ही परंपरा समृद्ध संतपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचा अनमोल ठेवा आहे. या पवित्र परंपरेचे जतन करत उत्सवाचे नियोजन करणाऱ्या स्वयंभू पांडुरंग उत्सव समिती, श्री संत खुशाल महाराज देवस्थान, सर्व सेवेकरी, आयोजक आणि भाविकांच्या सहभागातून संपूर्ण उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला.










