पालघर- कोसबाड कृषि विज्ञान केंद्रातर्फे डहाणू तालुक्यातील आशागड, कासा, सायवन भागातील १,४१२ शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने भाजीपाला लागवड कशी करावी याविषयी सर नेस वाडिया यांच्या आर्थिक सहकार्याने आणि कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणात ट्रे मध्ये सुदृढ भाजीपाला रोपे कशी तयार करावीत, बीज प्रक्रिया, वाफे तयार करणे, प्लास्टिक आच्छादन, रोपांची पुनर लागवड, क्रॉप कव्हर, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, संरक्षित सिंचन, पीक संरक्षण, काढणी, हाताळणी या विषयी कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अशोक भोईर, उत्तम सहाणे, प्रक्षेत्र व्यवस्थापक प्रशांत वरठा तसेच डॉ. विलास जाधव यांनी भाजीपाला मार्केटिंग याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
वांगी, मिरची, टोमॅटो, गवार, कोबी, फुलकोबी, नवलकोल, काकडी, दुधी, शिराळे, आदि वेलवर्गीय भाजीपाला, मेथी, पालक, कोथिंबीर अशा पालेभाज्या यांच्या लागवडी विषयी प्रात्यक्षिका सहीत माहिती दिली. कृषि विज्ञान केंद्रातर्फे एकूण ३३ प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले होते त्यापैकी केंद्राच्या प्रक्षेत्रावर १३ तर शेतकऱ्यांच्या शेतावर २० कार्यक्रम घेतले. प्रशिक्षणामध्ये एकूण १,४१२ आदिवासी शेतकरी बांधवानी सहभाग घेतला. त्यापैकी १०१६ पुरुष तर ३९६ महिला होत्या. बहुतांश लाभार्थी प्रशिक्षणार्थीमध्ये १०१८ सिमान्त शेतकरी, ३६३ अल्पभूधारक तर ४१ मध्यम जमीन धारक शेतकरी होते. प्रशिक्षणात सहभागी झालेले बहुतेक तरुण शेतकरी होते.
प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी वाडिया फाउंडेशनच्या जनरल मॅनेजर कुशाला शेट्टी, कार्यक्रम सहयोगी ओंकार घरत यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वयक म्हणून वाडिया फाउंडेशनचे पदाधिकारी नरेंद्र मुळे, विक्रांत जाधव, नवल चव्हाण, संदिप पिलेना, सचिन वझे, सुभाष महाला, कैलास लिलका, सुनिल हाडल, विशाल ठाकरे, नितेश वाघ तर कृषि विज्ञान केंद्राचे अनिलकुमार सिंग, दामिनी तांडेल यांनी विशेष मेहनत घेतली.
Discussion about this post