नांदेड जिल्हा प्रतिनिधी संदिप पानपते
किनवट, दि. २३ नोव्हेंबर
८३ किनवट विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी घोषित झाले असून महायुतीचे उमेदवार भीमराव केराम यांनी ९२०२८ इतके मतदान घेऊन दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळविला आहे. या विजयाचा सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला असून यावेळेला महायुतीसरकार मध्ये भीमराव केराम यांना मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा सर्वत्र होत आहेत . ८३ किनवट विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान संपन्न झाले असून दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी किनवट येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली सकाळी ७ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण १४ टेबलवर २४ फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया झाली या वेळेला एकूण १७ उमेदवार रिंगणात होते महायुतीचे भीमराव केराम व महाविकास आघाडीचे प्रदीप नाईक यांच्यात तुल्यबळ लढत झाली. चौदाव्या फेरीपर्यंत प्रदीप नाईक आघाडीवर होते त्यानंतर त्यांची पीछेहाट सुरू झाली ती अंतिम फेरीपर्यंत कायम राहिली. पाच वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालावरून भीमराव केराम यांना ९२०२८ मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी प्रदीप नाईक यांना ८६३७९ इतकी मते मिळाली.
चूरशीच्या लढतीत भीमराव केराम हे ५६४९ इतके मताधिक्य घेऊन विजयी झाले. प्रचाराच्या रणधुमाळीत सर्वत्र तुतारीची चर्चा झाली असली तरी निकालात मात्र कमळाने बाजी मारली असून किनवट विधानसभेतील भीमराव केराम यांचा हा दुसरा विजय आहे. या विजयानंतर महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर एकच जल्लोष साजरा केला तर किनवट शहरात व ग्रामीण भागात प्रमुख चौकात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली या निवडणुकीत माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आपली संपूर्ण राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती परंतु तुल्यबळ लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला. किनवट विधानसभेसह महाराष्ट्र राज्यात महायुतीने एकतर्फी विजय प्राप्त केला असून महायुतीच्या मंत्रिमंडळात किनवटचे आमदार भीमराव केराम यांना मंत्रीपदाची संधी मिळणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. किनवट विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी, दुर्गम मागास म्हणून ओळखला जातो या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी भीमराव केराम यांना मंत्रिपद मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे
Discussion about this post