तुमसर तालुका प्रतिनिधी
अनिल कारेमोरे
तुमसर : विधानसभेच्या निवडणुका आटोपल्यानंतर जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी आणि इच्छुकांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे वळले आहे. दोन-अडीच वर्षांपासून नगर परिषद तुमसरसह अनेक नगरपालिकांमध्ये प्रशासक राज सुरू आहे. त्यामुळे नागरी समस्या सोडवण्याची प्रक्रिया ठप्प झाली असून नागरिकांमध्ये नाराजी आहे.महायुती सरकारच्या घवघवीत विजयामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका तातडीने जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. इच्छुकांनी तयारी सुरू केली असून, माजी नगरसेवक व नवीन उमेदवारांनी प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
प्रशासक राजामुळे नागरी अडचणींमध्ये वाढ
पालिकेवर प्रशासक राज असल्याने थेट लोकप्रतिनिधींचा अभाव जाणवत आहे. नागरिकांना अस्वच्छता, पाणीपुरवठा, गटारींची सफाई, रस्त्यांची दुरुस्ती यांसारख्या समस्यांसाठी तक्रारी नोंदवणे कठीण झाले आहे. “नगरसेवक नसतील, तर आमची कामे कोण करणार?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
नव्या उमेदवारांची तयारी
विधानसभा निवडणुकांनंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आले आहे. अनेक इच्छुकांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून, मतदारसंघांमध्ये प्रचार कार्य हळूहळू गती घेत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची हालचालही वाढली आहे.
स्थानीक स्वराज्य निवडणुकांची प्रतीक्षा
महायुती सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घोषित करेल, अशी अपेक्षा आहे. या निवडणुकांच्या माध्यमातून नगरपालिकांमध्ये लोकशाही स्थापन होऊन नागरी समस्या मार्गी लागतील, अशी आशा नागरिक बाळगत आहेत.
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष निवडणुकीकडे
प्रशासक राजामुळे सामान्य नागरिकांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे या निवडणुका कधी होतील, याकडे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारने निवडणुका लवकर जाहीर करून स्थानिक समस्या सोडवण्यास गती द्यावी, अशी मागणी होत आहे.
Discussion about this post