मराठी भाषा समृद्ध करण्यात आचार्य अत्रे यांचे मोठे योगदान : डॉ. मोना चिमोटे
तालुका प्रतिनिधी अमरावती: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक जीवनात आपल्या असामान्य कर्तृत्वाने आचार्य अत्रे यांनी समाजजीवनात एक मानदंड निर्माण केला आहे. सामाजिक, राजकीय, साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात त्यांचे कार्य हिमालयाच्या उत्तुंग शिखरासारखे उंच आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अग्रणी नेते म्हणून त्यांनी वक्तृत्व व वृत्तपत्र यांचा प्रभावी वापर केला, असे प्रतिपादन विभागप्रमुख प्रा. डॉ. मोना चिमोटे यांनी केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाच्या वतीने साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने ‘आचार्य अत्रे यांच्या साहित्याचे अभिवाचन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रा.माधव पुटवाड व प्रा.डॉ. प्रणव कोलते उपस्थित होते.
आचार्य अत्रे यांच्या जन्मशताब्दी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने १३ ऑगस्ट २०२३ ते १३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत महाराष्ट्रातील विविध संस्थांच्या वतीने वर्षभर विविध साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या लेखणीतून महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विचारवंत म्हणून साहित्यिक आचार्य प्र.के.अत्रे यांचे योगदान नवीन पिढीला कळावे या भूमिकेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी आचार्य अत्रे यांच्या ‘झेंडूचीं फुले’ या पुस्तकातील विडंबन कवितांचे व ‘महापूर’ पुस्तकातील ‘सूर्य आणि चंद्र!’ आणि ‘शतायू महर्षी’ या लेखाचे अभिवाचन करण्यात आले.
यावेळी विभागातील अंशदायी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन अभिजित इंगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सारिका वनवे, अमृता राऊत, वैष्णवी मुळे, मनीष तायडे, उमाशंकर ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले.
Discussion about this post