पुणे जिल्हा प्रतिनिधी :- राजेंद्र शिंदे
दीप अमावस्या का साजरी करतात ??
आपल्या संस्कृतीत अनेक लहान मोठे सण विविध अर्थ घेऊन येतात. असाच एक सण म्हणजे दीप अमावस्या. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय.
या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. यंदाही दीप अमावस्या रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी आहे.
पूर्वी श्रावणात अंधारून येत असे आणि भरपूर पाऊस पडत असे, त्यामुळे पुढील बदलणाऱ्या हवामानाची तयारी म्हणून घरात असलेले दिवे, समई, निरंजन या सर्वांना एकत्र करून घासून पुसून स्वच्छ करून या दिवशी ठेवत असत त्यामुळे या दिवशी दिव्यांची पूजा सुरू झाली असावी.
दिव्यांची पूजा कशी करावी ?
दीप अमावस्या दिवशी सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ चकमकीत करून पाटावर व्यवस्थित मांडून घ्यावेत पाटाभोवती सुरेख अशी रांगोळी काढून फुलांची आरास करावी सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून सर्व दिवे प्रज्वलित करावे.
त्यानंतर सर्व दिव्यांची हळद कुंकू फुले अक्षदा वाहून मनोभावे पूजा करावी व गोडाचा नैवद्य दाखवावा. त्यानंतर प्रार्थना करावी मनातील वाईट नकारात्मक दुष्ट विचार नष्ट होऊ दे आणि सकारात्मक तेजोमय चांगले विचारांची आस धरू दे.
आपल्याकडे प्रत्येक लहान मोठ्या सणाला, उत्सवाला विशिष्ट अर्थ आहे. त्या मागील अर्थ समजून ते सण साजरे करणे खूप महत्त्वाचे आहे.

Discussion about this post