जागतिक कन्या दिनीच तीन मुली झाल्या खांदेकरी
■प्रतिनिधी : यशवंत महाजन कल्याण
संपर्क ९९३०७५१२५७
कळमसरे (ता. अमळनेर), दिनांक २२/ ९/२०२४
‘चार खांदेकरी एक मडके धरी’ असं म्हटले जाते. शेवटच्या क्षणी वंशाचा दिवा आपल्या पित्याला अग्निडाग देतो. मुलगा नसेल तर पुतण्या किंवा भाऊबंदकीतला पुढे येतो. मात्र रविवारी (ता. २२) कळमसरेतील जन्मदात्या पित्याचा वंशाचा दिवा आम्हीच म्हणत येथील तिघी मुलींनी अग्निडाग दिला.
भास्कर दयाराम बोरसे (वय ४५) यांचे रविवारी सकाळी अल्प आजाराने निधन झाले. मुलींचा आधारवड हिरावल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. पित्याला
अखेरचा निरोप देताना आम्हीच खांदेकरी व अग्निडाग देऊ, असा प्रस्ताव त्यांनी नातेवाईक व भाऊबंदकीला देत पित्याला अखेरचा निरोप दिला. यावेळी मात्र सर्व ग्रामस्थ व नातेवाईक यांना अभिमान वाटावा, असा क्षण अनुभवला. भास्कर बोरसे यांना तीन मुली, पत्नी संगीता व म्हातारे वडील दयाराम बोरसे यांच्यासोबत हातमजुरी करीत मुलींना शिक्षण देत होते. घरची परिस्थिती बेताची असताना मोठी मुलगी दीपाली, दुसरी कोमल यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. पुणे येथे मामाकडे राहून कंपनीत कामाला आहेत. तर लहान मुलगी हेमलता ही यंदा दहावीला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून भास्कर बोरसे हे आजारी असल्याने पत्नी संगीता, मुली दीपाली, कोमल यांनी दवाखानाही केला. ज्या बापाला आपल्याला तीन मुली आहेत याचे कधीही दुःख नव्हते तर त्या माझ्या वंशाचा दिवा आहेत. असेच नेहमी म्हणत. तीनही मुली शाळेत हुशार असल्याने वडिलांना मोठा गर्व होता. मात्र त्या मुलींचा आधारवडच आज जागतिक कन्या दिनी हिरावल्याने मुलींना अश्रू अनावर होते. तीनही बहिणींनी वडीलांना अग्निडाग देण्याचा घेतलेला निर्णय हा मुलगा-मुलगी भेदभाव करणाऱ्यांना मोठी चपराक असल्याची चर्चा होती.
Discussion about this post