श्रीगोंदा प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील शेतकरी कुटुंबातील ट्रॅक्टर चालकाची मुलगी प्रियंका हनुमंत दरवडे हिने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर पुणे शहर पोलीस कॉन्स्टेबल भरतीत उल्लेखनीय यश मिळवत गावाचा मान उंचावला आहे.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या प्रियंकाने शिक्षण घेत असतानाच शेतात काम व मजुरी करून कुटुंबाला हातभार लावला. परिस्थितीशी दोन हात करत तिने पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न जिवापाड जपले आणि अखेर ते साकार करून दाखवले. तिच्या या यशामागे प्रचंड मेहनत, आत्मविश्वास आणि कुटुंबाचा आधार असल्याचे दिसून येते.
प्रियंकाच्या या यशामुळे आढळगावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण पसरले असून, तिची यशोगाथा ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. “परिस्थिती नव्हे, तर जिद्द माणसाला मोठं बनवते” याचा जिवंत आदर्श प्रियंकाने घालून दिला आहे.
या यशानिमित्त गावात तिचा उत्साहात सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी शेरणी अर्पण करून आनंद व्यक्त केला.
या वेळी सरपंच शिवप्रसाद उबाळे, उपसरपंच अनुराधा अनिल ठवाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ, माजी सभापती विलासराव भैलुमे , ग्रामपंचायत सदस्य हनुमंत डोके, कल्याण दरोडे,मच्छिंद्र पंडित, डॉक्टर दरोडे तसेच दरोडे परिवार व आढळगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








