१३ व्या वर्षात पदार्पण; टाळ-मृदुंगाचा गजर, कीर्तन-भजन आणि महाप्रसादाने गावात भक्तीमय वातावरण
आढीव | प्रतिनिधी :
आढीव येथे श्री काळभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह २०२६ भक्तिमय वातावरणात सुरू आहे. या सप्ताहाचे हे १३ वे वर्ष असून, संपूर्ण गावात टाळ-मृदुंगाचा गजर आणि भक्तीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
सप्ताहानिमित्त पहाटे काकडा आरती, अभिषेक आणि पूजेने दिवसाची सुरुवात होते. त्यानंतर ग्रंथवाचन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आणि भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभर आयोजित केले जात आहेत. या धार्मिक सोहळ्यात वारकरी बांधव, महिला भगिनी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. टाळ-मृदुंगाच्या निनादाने आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे.
गावातील सर्व समाजबांधव, ग्रामस्थ आणि तरुण मंडळ यांच्या सहकार्याने हा सप्ताह उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत आहे. भाविकांसाठी महाप्रसादाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
गावाची एकजूट, भक्ती आणि परंपरा यांचा सुंदर संगम या सप्ताहातून अनुभवायला मिळत आहे. गेल्या १३ वर्षांपासून सुरू असलेली ही धार्मिक परंपरा ग्रामस्थांच्या सहभागामुळे अधिक उत्साहाने पुढे जात आहे.











