दापोली : केळशी गावातील रखडलेल्या नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाबाबत ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केळशी नळपाणी पुरवठा योजनेचे काम पुन्हा सुरू करून मूळ मंजूर योजनेतील सर्व उपांगांची कामे पूर्ण करण्याबाबत संबंधित ठेकेदाराने लेखी हमी दिल्याचे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, दापोली यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
केळशीचे माजी उपसरपंच केदार विलास पतंगे यांनी योजनेचे काम मागील दीड वर्षापासून अर्धवट अवस्थेत असल्याने उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर संबंधित विभागाने या प्रकरणाची दखल घेतली असून, योजनेचे काम करणाऱ्या वरदा प्रोजेक्ट्स यांना कामाबाबत सूचना देण्यात आल्याचे प्रशासनाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पावसाळ्यामुळे सध्या काम करण्यास अडचणी असल्याचे कारण देण्यात आले आहे. मात्र, संबंधित मक्तेदाराने दिलेल्या लेखी हमीनुसार ऑक्टोबर २०२६ अखेरपर्यंत काम पुन्हा सुरू करून मे २०२७ पर्यंत मूळ मंजूर योजनेतील सर्व उपांगांची कामे पूर्ण करण्यात येतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, दापोलीच्या उपअभियंत्यांनी केदार पतंगे यांना पत्र पाठवून उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. या पत्राची प्रत दापोली तहसीलदार तसेच पंचायत समिती दापोलीच्या गटविकास अधिकाऱ्यांनाही माहितीसाठी सादर करण्यात आली आहे.
दरम्यान, केळशी गावातील पाणीप्रश्नावरून ग्रामस्थांमध्ये नाराजी असून, रखडलेली योजना प्रत्यक्षात कधी सुरू होते आणि प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार मे २०२७ पर्यंत योजना पूर्ण होते का, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने दिलेली ही लेखी हमी केळशीकरांच्या पाणीप्रश्नाला कितपत दिलासा देते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.










