सेलू : मौजा दहेगाव गोसावी, ता. सेलू येथील ग्रामपंचायतीचे सरपंच पद आता राहिलेले नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदी/सेलूचे सदस्य संदीप सुरेश वाणी यांचे सदस्यत्व नियमानुसार रिक्त घोषित करावे, अशी मागणी दहेगाव गोसावी येथील १७ शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वर्धा यांच्याकडे निवेदन साद करण्यात आले.
निवेदनात संबंधित सदस्याचे ग्रामपंचायतीतील सरपंच पद राहिलेले नसल्यामुळे पदसिद्ध सदस्यत्वाची अट पूर्ण होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व नियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम १५(१) च्या परंतुकान्वये तसेच उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठातील रिट याचिका क्र. ४०३०/२०१८ मधील आदेशाच्या अनुषंगाने या सदस्यत्वाबाबत नियमानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
संबंधित जागा रिक्त घोषित करून पुढील प्रक्रिया तातडीने राबवावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. सदस्यत्वाच्या प्रश्नामुळे शेतकरी सभासदांचे प्रतिनिधित्व आणि बाजार समितीच्या कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाने कायद्यानुसार निर्णय घ्यावा, अशी भूमिका निवेदनकर्त्यांनी मांडली.
या निवेदनावर रामकिशोर रामाजी शिंगनधुपे, डॉ. सुरेश पांडुरंग धंदरे, प्रणय ज्ञा. शेंद्रे, अमोल मधुकर पिठाले, मंगेश वि. तिजारे, उमेश मा. राऊत, संजय ह. पिसुडे, सचिन अ. महाबुधे, सुधाकर शं. खाडे, धनराज मा. कावळे, सुरेंद्र दे. तिवाडे, केशव रा. सावरकर, अंकुश ह. काळे, आशिष सु. मोरवाल, निलेश श्री. तिजारे, विजय शं. देवताळे आणि निलेश दा. बांगडे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेऊन संबंधित सदस्यत्वाबाबत कायद्यानुसार तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.







