पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांच्या अधिकारांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
लोणार, दि. २८ सप्टेंबर २०२६ : अमृत सेवाभावी संस्था, परभणी संचालित कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार, राष्ट्रीय सेवा योजना आणि कै. कमलाबाई बनमेरू महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना माहितीचा अधिकार, प्रशासनातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू होते. प्रमुख मार्गदर्शक ॲड. विठ्ठल तनपुरे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील विविध तरतुदींची माहिती दिली. माहिती अधिकाराचा अर्ज कसा करावा, कोणती माहिती मागविता येते, जनमाहिती अधिकाऱ्याची भूमिका तसेच माहिती न मिळाल्यास अपील प्रक्रियेचा वापर कसा करावा, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतोष बनमेरू, राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय समन्वयक डॉ. कमलाकर वाव्हळ, प्रथम अपिलीय अधिकारी श्री. रमेश बनमेरू आणि रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. महेंद्र भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
“माहितीचा अधिकार हा केवळ माहिती मिळविण्याचे साधन नसून प्रशासनातील पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग वाढविणारे प्रभावी माध्यम आहे,” असे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी माहितीच्या अधिकाराचा जबाबदारीने आणि कायदेशीर चौकटीत वापर करून आपल्या हक्कांविषयी जागरूक राहावे, असे आवाहनही करण्यात आले.
प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू व श्री. रमेश बनमेरू यांनी माहितीचा अधिकार, पारदर्शकता, जबाबदारी आणि सशक्त नागरिक यांचा परस्परसंबंध स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी कायद्याचे ज्ञान आत्मसात करून समाजात जनजागृती करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरिकांचे अधिकार, शासकीय यंत्रणेची कार्यपद्धती, पारदर्शक प्रशासन आणि सामाजिक उत्तरदायित्व याबाबत जागरूकता निर्माण झाली. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“माहिती जाणून घ्या – अधिकार समजून घ्या – जबाबदार नागरिक बना” या संदेशाने माहिती अधिकार दिनाचा कार्यक्रम मार्गदर्शक व जनजागृतीपर ठरला.






