पुणे | प्रतिनिधी
पुणे येथील साखर संकुल येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलांच्या वतीने शेतकऱ्यांना वाढलेल्या साखरेच्या किमतीच्या तुलनेत योग्य ऊसदर व अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले.
गत हंगामात ऊस पिकवलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ प्रति टन १,००० रुपये अनुदान जमा करण्यात यावे, तसेच आगामी हंगामासाठी ७,००० रुपये प्रतिटन एफआरपी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यासोबतच ऊस वजन करताना काटा मारणाऱ्या, रिकव्हरी कमी दाखवणाऱ्या तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्तांची भेट घेऊन विविध मागण्यांबाबत चर्चा केली. त्यानंतर मागण्यांचे निवेदन साखर आयुक्तांकडे सादर करण्यात आले. शेतकऱ्यांना त्यांच्या ऊस उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा आणि साखर उद्योगातील अनियमिततेवर कारवाई व्हावी, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.








