- प्रतिनिधी:
आलोक बांडे, मालेगाव, जिल्हा वाशिम
मो नं – 9623582185
मालेगाव (वाशिम):
मालेगाव व परिसरात पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी वर्गाची चिंता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मृग आणि आर्द्रा नक्षत्रात समाधानकारक हजेरी लावणाऱ्या पावसाने ऐन पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पाठ फिरवल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. सध्या शेतात उभी असलेली सोयाबीन, तूर व इतर पिके पाण्याविना सुकण्याच्या मार्गावर असून, हक्काच्या पावसाबद्दल शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.
या वर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीला पाऊसमान चांगले राहिल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने आणि खर्च करून पेरण्या केल्या होत्या. मात्र, पावसाचा खंड पडल्यामुळे पिकांना जीवदान देण्यासाठी आता सिंचनाची तातडीची गरज भासत आहे. अनेक भागांत विहिरींची आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावत चालल्याने शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कष्टाने पिकवलेली शेती डोळ्यांसमोर सुकत असल्याचे पाहून बळिराजा हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक मदार ही संपूर्णपणे शेती उत्पन्नावर अवलंबून असते. शेतात पैसा नसल्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील बाजारपेठांवर आणि व्यवसायांवर झाला आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळत नसल्याने खत-बियाणे, शेती अवजारे आणि इतर किरकोळ दुकानांमधील उलाढाल मंदावली असून, संपूर्ण व्यवसाय क्षेत्रात मंदीचे सावट पसरले आहे.
या कठीण परिस्थितीत शासनाने व प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या परिस्थितीची गंभीर दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी आर्त हाक हवालदिल शेतकरी वर्गाकडून दिली जात आहे.










