पाचोरा (प्रतिनिधी):
खानदेशची कुलस्वामिनी आणि श्रद्धास्थान असलेल्या कानबाई मातेचा उत्सव पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणीचे येथे अत्यंत उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक थाटात साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण बांबरुड राणीचे गावात आनंदाला उधाण आले होते.
कानबाई मातेचा उत्सव हा खानदेशी संस्कृतीचा अनमोल ठेवा मानला जातो. या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नोकरी, व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे गावाबाहेर स्थायिक झालेले नागरिक आवर्जून आपल्या मूळ गावी परततात. यंदाही सर्व ग्रामस्थ एकत्र आल्यामुळे गावात दिवाळीसारखा सणाचा माहौल पाहायला मिळाला. या दिवशी प्रत्येक घरात कानबाई मातेला दाखवण्यासाठी गरमागरम पुरणपोळीचा नैवेद्य आणि स्वयंपाक बनवण्याची वर्षानुवर्षांची परंपरा मोठ्या श्रद्धेने पाळण्यात आली.
उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते गावातील जुने ‘वही मंडळ’. या वही मंडळाने रात्रभर कानबाई मातेची पारंपरिक वही गायन (लोकगीते आणि कथा) सादर करून संपूर्ण परिसर भक्तिमय करून टाकला. मंडळातील कलाकारांच्या सुरेल आणि तालबद्ध वही गायनाने उपस्थित भाविकांची मने जिंकली.
मातेची महाआरती, मनोभावे पूजन आणि दर्शनासाठी दिवसभर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सर्व ग्रामस्थांच्या एकोप्याने आणि उत्साहाने बांबरुड राणीचे येथील कानबाई उत्सव यंदाही अत्यंत जल्लोषात पार पडला.








