
सुळेवाडीच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य; मुख्याध्यापक नागनाथ शेटे यांचे ३६ वर्षांचे उपक्रमशील कार्य
सुळेवाडी, ता. माळशिरस : शिक्षक हा केवळ वर्गातील धडे शिकवणारा नसतो, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत त्यांच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणारा मार्गदर्शक असतो. ही भूमिका आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत जपणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुळेवाडी (ता. माळशिरस) येथील मुख्याध्यापक नागनाथ बजरंग शेटे हे उपक्रमशील शिक्षक म्हणून आदर्शवत कार्य करत आहेत.
अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, आरोग्यविषयक जाणीव, क्रीडाप्रेम तसेच पर्यावरण संवर्धनाची भावना रुजविण्यावर शेटे सरांचा विशेष भर आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळावे, या उद्देशाने त्यांनी शाळेत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीची परंपरा निर्माण केली आहे.
इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून, नवोदय परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यातही शेटे सरांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षांची गोडी निर्माण होऊन त्यांच्या आत्मविश्वासाला चालना मिळत आहे.
शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा शैक्षणिक उठाव करण्यातही त्यांचा पुढाकार राहिला आहे. उपलब्ध साधनसामग्रीचा प्रभावी वापर करत विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी दर शनिवारी योगासने घेतली जातात. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावे आणि शिक्षणाबरोबरच संस्कारांची पेरणी व्हावी, यासाठी शाळेत विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
शिक्षण, संस्कार, तंत्रज्ञान आणि विविध उपक्रमांची सांगड घालत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणारे नागनाथ शेटे यांचे कार्य ग्रामीण शिक्षण क्षेत्रासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.


