शिक्षक दिन उत्साहात साजरा
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्रकुमार वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण व पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे विद्यार्थ्यांनी शब्दसुमनांनी स्वागत केले.
या कार्यक्रमाचे निवेदन तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांनी नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी मनोगत व्यक्त करून त्यांच्या जीवनातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दुर्वा शिगवण, तन्वी कुंभार, साफिया माद्रे, श्रावणी राठोड, संस्कृती हुमणे व धनश्री गायकवाड यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. मणिकर्णिका गुडेकर ने सुंदर गीत गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी शिक्षक नितीन सावंत, अशोक शितोळे व दादासाहेब पांढरे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी जीवनात शिक्षकांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले. शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे मार्गदर्शक असल्याचे सांगत, राष्ट्राच्या उभारणीसाठी विद्यार्थ्यांनी जबाबदार व आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा. आई-वडील आणि शिक्षकांनी दिलेले संस्कार जपत ज्ञान, शिस्त व कर्तव्यभावनेच्या बळावर भारताचे सक्षम नागरिक बनावे, असे आवाहन प्राचार्य राजेंद्रकुमार वारे यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान विविध प्रेरणादायी उदाहरणे व विचारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

