
१२ सप्टेंबर रोजी गुरुद्वारा गेट क्रमांक १ येथे आयोजन; विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी
नांदेड : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि श्री गुरु रामदासजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरु ग्रंथ साहिबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वानिमित्त नांदेड येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत गुरुद्वारा गेट क्रमांक १, नांदेड येथे होणार आहे. या शिबिरात नागरिकांना विविध आरोग्यविषयक तपासण्या व तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मोफत मिळणार आहे.
शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे पात्र नागरिकांसाठी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड बनवून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, अस्थी विकार, बालरोग, हृदयरोग, नेत्रविकार, स्त्रीरोग, दंतरोग आणि फिजिओथेरपी या विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. यासोबतच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
या महाआरोग्य शिबिरात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय, श्री गुरुगोविंदसिंगजी स्मारक जिल्हा सामान्य रुग्णालय, विष्णुपुरी, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, नांदेड दंत रुग्णालय, लायन्स हॉस्पिटल, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि नांदेड फिजिओथेरपी कॉलेज सहभागी होणार आहेत.
शिबिराचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांनी रेशनकार्ड, आधार कार्ड, जुन्या वैद्यकीय फाईल्स तसेच सुरू असलेली औषधे सोबत आणावीत, असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
या महाआरोग्य शिबिराचे आयोजन स. गुरदीपसिंह संधू, महाराष्ट्र प्रदेश प्रमुख (सिख) अल्पसंख्याक मोर्चा, भारतीय जनता पार्टी तथा अध्यक्ष, श्री गुरु रामदासजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
नांदेड शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
