दहिगाव येथे पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न; कर्जमुक्ती, पीक विमा आणि नुकसानभरपाईची मागणी
तेल्हारा / प्रतिनिधी :
अहोरात्र कष्ट करून देशासाठी अन्नधान्य पिकवणारा बळिराजा आज निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि शासनाकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याच्या परिस्थितीमुळे संकटात सापडला आहे. तेलंगणा असो वा विदर्भ, शेतकऱ्यांच्या अडचणी गंभीर बनल्या असून दिवाळीच्या उंबरठ्यावरही ठोस मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. परिणामी, अनेक शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.
या पार्श्वभूमीवर ‘स्वराज्य’ संघटनेने तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, पीक विम्याची रक्कम आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास दिवाळीत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना आक्रमक भूमिका घेणार असून, शेतकरीविरोधी धोरणांविरोधात आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या लढ्यात तरुण वर्गही सहभागी होत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे शासन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.











