
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘मनोजदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणांनी परिसर दणाणला; पुणे-अहिल्यानगर मार्गावर तासाभराहून अधिक काळ ठिय्या
शिरूर : प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिरूर शहरात समाजबांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शहरातून जाणाऱ्या पुणे-अहिल्यानगर मार्गावरील पाबळ फाटा येथे आंदोलकांनी ठिय्या देत आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली.
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘मनोजदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’ अशा घोषणांनी आंदोलनस्थळ दणाणून गेले. तासाभरापेक्षा अधिक काळ रस्ता रोखून धरल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
दुपारच्या कडक उन्हाची पर्वा न करता महिला, तरुण तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. हातात भगवे झेंडे घेत आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. सामाजिक कार्यकर्ते सावळेराम आवारी यांनीही उन्हात रस्त्यावर झोपून आंदोलनात सहभाग नोंदवला.
आंदोलनामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या आंदोलनात नगरसेवक अभिजीत पाचर्णे, सुनील जाधव, सागर नरवडे, उमेश शेळके, नीलेश गाडेकर, युवा नेते अविनाश घोगरे, रामभाऊ शेटे, बबन महाराज थोरात, वैशाली गायकवाड, हरिभाऊ वीर, प्रा. सतीश धुमाळ, संतोष शिंदे, रमेश दसगुडे, विश्वास पतंगे, प्रदीप वाखारे, राहुल निकुंभ, योगेश महाजन, अविनाश जाधव, स्वप्नील रेड्डी, बबन जगदाळे, संभाजीराजे कर्डिले, संपत दसगुडे, सुशांत कुटे, महेंद्र येवले, केशव शिंदे, जयवंत साळुंके, नामदेव पवार, सुनील पडवळ, नंदू जाधव, सूरज काळे आदींसह शिरूर शहर व पंचक्रोशीतील समाजबांधव, तरुण आणि महिला सहभागी झाले होते.
दरम्यान, लहूजी शक्ती सेना व मातंग एकता आंदोलनाच्या वतीनेही रास्ता रोको आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. याबाबतचे समर्थन पत्र दादाभाऊ लोखंडे व विशाल जोगदंड यांनी दिले.
‘शांततेच्या मार्गाने आंदोलन करा’
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको करण्यात आल्याचे सुनील जाधव यांनी सांगितले. समाजाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततामय मार्गाने आंदोलन करणे आवश्यक आहे. मात्र, आंदोलनादरम्यान कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि आंदोलनाला गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
‘समाजाच्या भावना शासनदरबारी पोहोचवाव्यात’
प्रा. सतीश धुमाळ यांनी प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या भावना शासनदरबारी पोहोचवाव्यात, अशी मागणी केली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आगामी काळात पुणे-अहिल्यानगर महामार्गावर मोठे आंदोलन करण्याचा इशारा रमेश दसगुडे यांनी दिला.
शासनाने मराठा समाजाला वारंवार आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचे प्रकार थांबवावेत. आरक्षणाच्या प्रश्नावर तातडीने सकारात्मक व ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी वैशाली गायकवाड यांनी केली.
आंदोलनानंतर पोलिस निरीक्षक विनोद पाटील व निवासी नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली.
घोषणांनी दणाणला परिसर
आंदोलनादरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’, ‘मनोजदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!’, ‘कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही!’ आणि ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
भर उन्हातही आंदोलनाचा निर्धार
तळपत्या उन्हाची पर्वा न करता महिला, तरुण आणि समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. भगवे झेंडे हातात घेत आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी करत आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.

