
वर-वधूच्या पालकांसह संबंधितांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल
कुरुंदवाड : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी कारवाई करत २६ वर्षीय नवरदेवाला अटक केली आहे. बिरू तपन्ना बेळगे (वय २६, रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात बालविवाहास संमती देऊन तो घडवून आणल्याप्रकरणी वर आणि वधू या दोन्ही बाजूंच्या पालकांविरुद्धही बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पट्टणकोडोली येथील बिरू तपन्ना बेळगे याचा विवाह एका अल्पवयीन मुलीशी ठरविण्यात आला होता. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होणे कायद्यानुसार आवश्यक असताना तिचा विवाह झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
या प्रकरणी नवरदेव बिरू बेळगे याला अटक करण्यात आली असून, बालविवाहाला प्रोत्साहन देणे, संमती देणे अथवा विवाह घडवून आणण्यास सहकार्य केल्याच्या आरोपावरून दोन्ही बाजूंच्या पालकांसह संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह रोखण्यासाठी कठोर तरतुदी आहेत. बालविवाहास प्रोत्साहन देणाऱ्या, तो घडवून आणणाऱ्या किंवा त्यास सहकार्य करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे कुरुंदवाड पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
