
खासदार सुनील तटकरे यांचे मार्मिक प्रतिपादन; पावणे पाच कोटींच्या नवीन पोलीस ठाणे इमारतीचे भूमिपूजन
म्हसळा (रायगड) : प्रतिनिधी
खासदार सुनील तटकरे आणि महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रशासकीय मान्यता मिळालेल्या म्हसळा पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. सुमारे पावणे पाच कोटी रुपये खर्चाच्या या अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश तटकरे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी पोलीस ठाणे व स्मशानभूमीसारख्या सुविधांच्या उद्घाटनाबाबत मार्मिक भाष्य केले. ते म्हणाले, “स्मशानभूमी असो किंवा पोलीस ठाणे, अशा विकासकामांचे भूमिपूजन किंवा लोकार्पण करताना शुभेच्छा तरी काय देणार? इमारत उत्तम व्हावी, पोलीस प्रशासनाचे काम चांगले चालावे; मात्र नागरिकांना पोलीस ठाण्यात येण्याची वेळच कमी यावी, हीच अपेक्षा आहे.”
म्हसळा येथे शिवसृष्टी उभारण्यात येत असल्याने या परिसराला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकाला लागूनच उभारण्यात येणाऱ्या नवीन पोलीस ठाण्याच्या इमारतीमुळे म्हसळा शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात निश्चितच भर पडेल, असे तटकरे यांनी सांगितले.
इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी संबंधित ठेकेदार आणि कंपनीच्या प्रतिनिधींना बांधकाम दर्जेदार व निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
विविध विकासकामांचा आढावा
आपल्या सार्वजनिक जीवनातील विविध जबाबदाऱ्यांचा उल्लेख करताना तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या विविध शासकीय व लोकपयोगी प्रकल्पांची माहिती दिली. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्याचे अर्थमंत्री तसेच पालकमंत्री म्हणून काम करताना अनेक विकासकामे करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यात पोलिसांच्या सेवेसाठी ११० वाहने उपलब्ध करून देण्यात आली, तसेच म्हसळा येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आणि श्रीवर्धन येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. श्रीवर्धन तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, नगरपरिषद इमारत, म्हसळा बसस्थानक, पंचायत समिती इमारत, म्हसळा नगरपंचायत इमारत आणि शिवसृष्टी यांसारखी विविध विकासकामे सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिसांना संवेदनशील तपासाचे आवाहन
पोलीस प्रशासनाला मार्गदर्शन करताना तटकरे यांनी गुन्ह्यांचा अधिक खोलवर जाऊन तपास करण्याची गरज व्यक्त केली. विशेषतः संवेदनशील घटना घडल्यास पोलिसांनी संवेदनशील पद्धतीने तपास करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“मी कधीही गुन्हेगारी प्रवृत्तीचे समर्थन केले नाही आणि यापुढेही करणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी पोलीस आणि नागरिकांमध्ये सुसंवाद व विश्वासाचे नाते निर्माण होण्याची गरज व्यक्त केली. कायदा-सुव्यवस्था राखण्यासोबतच नागरिकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचे आवाहन त्यांनी पोलिसांना केले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला उपअधीक्षक पवार, उपविभागीय अधिकारी योगिता कुटे, सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर बनकर, माजी सभापती अध्यक्ष नाझिम हसवारे, सभापती बबन मनवे, जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे, जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत, नगराध्यक्ष सुनील शेडगे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, उपसभापती लहू म्हात्रे, पंचायत समिती सदस्या प्रियंका निंबरे, समृद्धी चाचले, महिला अध्यक्षा मीना टिंगरे, गटनेते संजय कर्णिक, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी खासदार सुनील तटकरे यांनी विकासकामांसाठी केंद्रातील निधीची कमतरता पडणार नाही, असे सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विशेष सहकार्य लाभत असल्याचे सांगून त्यांनी त्यांचे आभार मानले.
