बैलजोड्यांची सवाद्य मिरवणूक; शेतकऱ्यांनी व्यक्त केली आपल्या कष्टकरी सोबत्यांप्रती कृतज्ञता
मानवत : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा आणि पारंपरिक सण असलेला बैलपोळा मानवत तालुक्यात शहरासह सर्वच गावांमध्ये मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. वर्षभर शेतकऱ्यांसोबत शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याने गावागावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
पोळ्यानिमित्त पहाटेपासूनच शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांना नदी, ओढे तसेच इतर जलस्रोतांवर नेऊन स्वच्छ धुलाई केली. त्यानंतर बैलांच्या शिंगांना हिंगूळ लावून, बेगड, रंगीबेरंगी झुली, मोरखी आदींनी सजावट करण्यात आली. गळ्यात गोंड्यांच्या माळा आणि पायात घुंगरू बांधून बैलजोड्यांना आकर्षक रूप देण्यात आले. काही शेतकऱ्यांनी बैलांच्या पाठीवर नक्षीकाम केलेल्या सुंदर झुलीही टाकल्या होत्या.
दुपारनंतर गावातील मारुती मंदिर परिसरात बैलजोड्यांची एकत्रित पारंपरिक पूजा करण्यात आली. ज्येष्ठ मंडळींनी बैलांचे औक्षण करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरविला. यावेळी शेतकरी बांधवांनी आपल्या कष्टकरी सोबत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत ‘आमचा बळीराजा सुखी राहो’ अशी प्रार्थना केली.
तालुक्यातील विविध गावांमध्ये बैलजोड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात लहान मुले आणि तरुणांनी पोळ्याचा आनंद लुटला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या लहान मुलांना बैलांवर बसवून आनंदाचे क्षण टिपले.
तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असतानाही पोळा सणाच्या उत्साहावर त्याचा परिणाम जाणवला नाही. गावागावात नागरिकांनी एकोप्याने आणि आनंदाने हा पारंपरिक सण साजरा केला. सायंकाळी घरोघरी पुरणपोळीचा स्वयंपाक करून कुटुंबीयांसमवेत सणाचा आनंद घेण्यात आला.
बैलपोळा हा केवळ एक सण नसून शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नात्याचे प्रतीक आहे. मानवत तालुक्यातील उत्साहपूर्ण वातावरणातून हे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले.


