पुणे जिल्हा प्रतीनिधी: अविनाश घोगरे
शिरूर: शिरूर शहर व परिसरातील घरगुती गौरी-गणपती सजावटीला प्रोत्साहन मिळावे, तसेच गणेशोत्सवातील कलात्मकता, पर्यावरणपूरक सजावट आणि सामाजिक संदेशांना व्यासपीठ मिळावे, यासाठी भूमिपुत्र प्रतिष्ठानकडून दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन आज उद्योजक श्री. प्रकाश धारिवाल व श्री. आदित्य धारिवाल यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी ‘गणराया करंडक २०२६’ या स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
शिरूर शहर व परिसरातील गणेशभक्तांसाठी भूमिपुत्र प्रतिष्ठानकडून गेल्या चार वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती सजावटीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गौराई सजावट, गणपती सजावट तसेच लहान मुलांसाठी ‘सेल्फी विथ बाप्पा’ या स्पर्धांचा समावेश आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या कलात्मकतेला, कल्पकतेला आणि सजावटीतील वैशिष्ट्यांना प्रोत्साहन देण्यात येणार असून, विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व आकर्षक भेटवस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.
भूमिपुत्र प्रतिष्ठानकडून आयोजित या स्पर्धेची ओळख घरगुती सजावट, आकर्षक रोषणाई, पर्यावरणपूरक उपक्रम आणि सामाजिक संदेश यांसाठी निर्माण झाली आहे. स्पर्धेला दरवर्षी गणेशभक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यंदाही चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास उद्योजक श्री. प्रकाश धारिवाल यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे, नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य प्रशांत शिंदे, संतोष शितोळे, तुकाराम खोले, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष किरण बनकर, सामाजिक कार्यकर्ते योगेश जामदार, निलेश जाधव आदी उपस्थित होते.







