परवानगीपेक्षा अधिक फांद्या तोडल्याचा आरोप; स्थळपाहणी व पंचनामा करण्याची नागरिकांची मागणी
हिंगणघाट (प्रतिनिधी) :
संत ज्ञानेश्वर वॉर्ड, शालंगडी रोड येथील सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरातील सुमारे २०० ते ३०० वर्षे जुने, ऐतिहासिक महत्त्व असलेले चिंचेचे झाड मोठ्या प्रमाणात तोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक व वृक्षप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सदर चिंचेचे झाड परिसराची ओळख आणि अस्मिता मानले जात होते. झाडाची एक फांदी मंदिराच्या कळसाला व छताला अडथळा ठरत असल्याने केवळ आवश्यक फांदी छाटण्याची परवानगी नगर परिषदेकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात परवानगीच्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात झाडाच्या मोठ्या शाखांची तोड करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, झाडाचा मोठा भाग आधीच तोडण्यात आल्याने त्याचा नैसर्गिक समतोल बिघडला असून झाड मंदिराच्या दिशेने झुकले आहे. सध्या झाडाचा केवळ काही भाग शिल्लक राहिल्याने त्याच्या अस्तित्वाबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) अधिनियम, २०२१ मधील तरतुदींनुसार ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या वृक्षांना वारसा वृक्षाचा दर्जा देण्याची तरतूद आहे. त्यामुळे या प्रकरणाची कायदेशीर व पर्यावरणीय दृष्टीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वन विभाग व वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून तोडण्यात आलेल्या शाखांचा पंचनामा करावा, तसेच परवानगीच्या मर्यादेचा भंग झाला आहे का, याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि उर्वरित वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वृक्षप्रेमी नागरिकांकडून करण्यात आली आहे.










