कमान कोसळली त्यावेळी नागरिक व वाहने नसल्याने मोठी जीवितहानी टळली
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :
पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी येथील मॅगझिन चौक परिसरात सोमवारी सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे गणेशोत्सवानिमित्त उभारण्यात आलेली कमान अचानक रस्त्यावर कोसळली. कमान मुख्य रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला.
कमान कोसळली त्यावेळी तिच्या खाली नागरिक किंवा वाहने नसल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र, या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या उत्सवी कमानी, मंडप व तात्पुरत्या संरचनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक व संबंधित यंत्रणेकडून रस्त्यावरील अडथळा दूर करण्याची कार्यवाही करण्यात आली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उत्सवी कमानी व तात्पुरत्या संरचनांची मजबुती आणि सुरक्षितता तपासून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.











