दुष्काळी पाहणी दौऱ्यात पालकमंत्री अतुल सावे यांना मोहनराव तुरटवाड यांचे निवेदन
नायगाव : प्रतिनिधी — नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अतुल सावे दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असता, भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मोहनराव तुरटवाड यांनी त्यांची भेट घेऊन घुंगराळा येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याबाबत निवेदन दिले.
घुंगराळा व परिसरात मोठ्या प्रमाणावर पशुधन असून, जनावरांच्या उपचारासाठी पशुपालकांना इतर ठिकाणी जावे लागते. तसेच आठवडी बाजार, पशुपालकांची संख्या आणि खंडोबा महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर होणारे पशुप्रदर्शन लक्षात घेता गावात पशुवैद्यकीय दवाखान्याची आवश्यकता असल्याचे तुरटवाड यांनी निवेदनात नमूद केले.
याबाबत राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे शिफारस करून दवाखाना मंजूर करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करावा, अशी विनंतीही त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. दवाखाना मंजूर झाल्यास परिसरातील पशुपालकांना वेळेत उपचाराची सुविधा उपलब्ध होऊन त्यांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.










