मराठी चित्रपटसृष्टीला मानाचा बहुमान; घुंगराळ्याचे अभिनेते प्रभाकर मठपती यांच्या कलाप्रवासाची दखल
नायगाव प्रतिनिधी
घुंगराळा : नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील अभिनेते प्रभाकर मठपती यांच्या अभिनयाचा समावेश असलेल्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची २०२७ च्या ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने ३३ चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड केली आहे.
संतोष डावखर लिखित-दिग्दर्शित ‘गोंधळ’ हा ग्रामीण महाराष्ट्रातील पारंपरिक गोंधळ लोकपरंपरेच्या पार्श्वभूमीवर आधारित मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाला यापूर्वी ५६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शनासाठी ‘सिल्व्हर पीकॉक’ पुरस्कार मिळाला आहे.
घुंगराळा येथून अभिनय क्षेत्रात वाटचाल सुरू केलेल्या प्रभाकर मठपती यांच्या कलाप्रवासाचा संबंध आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील या महत्त्वाच्या चित्रपटाशी जोडला गेल्याने परिसरात आनंद व्यक्त होत आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे स्थानिक कलाकार आणि युवकांना प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ‘गोंधळ’ची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली असली तरी अंतिम ऑस्कर नामांकन अद्याप निश्चित झालेले नाही.








