२१ माहिती अधिकार अर्जांवर उत्तर नसल्याचा आरोप; २४ ऑक्टोबरपर्यंत दप्तर तपासणीची तारीख देण्याची मागणी
लांजा प्रतिनिधी
लांजा : हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कामकाजासंदर्भात दाखल केलेल्या २१ ऑनलाइन माहिती अधिकार अर्जांवर विहित मुदतीत माहिती मिळाली नसल्याचा आरोप करत हर्दखळे येथील रहिवासी किरण दत्ताराम चव्हाण यांनी लांजा पंचायत समितीसमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. येत्या २४ ऑक्टोबरपर्यंत संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दप्तर तपासणीची निश्चित तारीख व वेळ लेखी स्वरूपात कळवावी; अन्यथा २६ ऑक्टोबर रोजी शांततापूर्ण मार्गाने उपोषण करण्यात येईल, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण यांनी मे २०२६ पासून माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत हर्दखळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांशी संबंधित विविध विषयांवर एकूण २१ ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. यामध्ये चौदावा वित्त आयोग, नवीन इमारतीचे बांधकाम आणि नळजोडणी यादी आदी विषयांचा समावेश आहे. मात्र, विहित मुदत उलटूनही ग्रामसेविकेकडून मागितलेली माहिती मिळाली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. तसेच, प्रथम अपीलावरही सुनावणी झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी चव्हाण यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्याकडे दाद मागितली होती. त्यानंतर जिल्हा परिषद कार्यालयाकडून लांजा गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या निर्देशांनंतरही प्रत्यक्ष कार्यवाही झाली नसल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.

यापूर्वी १५ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रशासनाच्या विनंतीवरून ते आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतरही ठोस कार्यवाही न झाल्याने पुन्हा उपोषणाचा इशारा देण्यात आल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाला ई-मेल आणि निवेदनाद्वारे दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही दप्तर तपासणीची तारीख आणि कायदेशीर कार्यवाहीबाबत निर्णय होत नसल्याने, २४ ऑक्टोबरपर्यंत मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास २६ ऑक्टोबर रोजी लांजा पंचायत समितीसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.








