अप-डाऊन जलद आणि धीम्या मार्गावरील सेवांवर परिणाम; स्थानकांवर प्रवाशांची गर्दी, दुरुस्तीचे काम सुरू
मुंबई : मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आज तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील उच्चदाबाची (HT) ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडली. यामुळे मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास हा प्रकार घडला. या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन दिशेच्या जलद तसेच धीम्या मार्गावरील लोकल सेवांवर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. काही लोकल गाड्या थांबून राहिल्याने स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. वाहतूक पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी वेळ लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या तांत्रिक बिघाडामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांसह इतर प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी मध्य रेल्वेच्या अधिकृत सूचना व अद्ययावत वाहतूक माहिती तपासावी.










