तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब, नांदेड येथे संत-महापुरुष आणि धार्मिक मान्यवरांची बैठक; युवकांना गुरमतशी जोडून चांगले संस्कार रुजविण्यावर भर
नांदेड : प्रतिनिधी
युवापिढीला सर्व प्रकारच्या अमली पदार्थांच्या व्यसनांपासून दूर ठेवून त्यांना गुरमतशी जोडणे, तसेच त्यांच्यामध्ये नैतिक मूल्ये आणि चांगले संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने ‘हर घर गुरमत’ मिशनच्या प्रचार-प्रसारासाठी तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब, नांदेड येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
माननीय पंज प्यारे साहिबान यांच्या प्रेरणेने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. स. विजय सतबीर सिंघ यांच्या मार्गदर्शनात या मिशनची सुरुवात करण्यात आली आहे. पंजाबमधील बटाला शहरातून या मोहिमेचा प्रारंभ झाला होता. आता युवकांना व्यसनांपासून दूर ठेवून त्यांना धार्मिक आणि नैतिक मूल्यांशी जोडण्यासाठी या उपक्रमाचा व्यापक प्रचार-प्रसार करण्यावर भर देण्यात येत आहे.
संत बाबा कुलवंत सिंघ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
या गंभीर सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्यासाठी माननीय संत बाबा कुलवंत सिंघ जी जत्थेदार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी असलेल्या ‘देवडी’ येथे बैठक पार पडली. या बैठकीला पंज प्यारे साहिबान, विविध संप्रदायांचे संत-महापुरुष तसेच दल-पंथांचे प्रमुख उपस्थित होते.
बैठकीला सिंघ साहिब भाई राम सिंघ जी, मीत जत्थेदार; सिंघ साहिब भाई सरबजीत सिंघ जी, निर्मले हैड ग्रंथी; सिंघ साहिब भाई गुरमीत सिंघ जी, मीत ग्रंथी; सिंघ साहिब भाई गुरदीप सिंघ जी, धुपीया; बाबा बलबीर सिंघ जी, जत्थेदार बुढा दल ९६ करोडी; बाबा अवतार सिंघ जी, दल बाबा बिधी चंद जी; बाबा गुरदेव सिंघ जी, तरणा दल; बाबा जोगा सिंघ जी, तरणा दल; बाबा मेजर सिंघ जी आणि बाबा हरी सिंघ जी, मिशल तरणा दल उपस्थित होते.
तसेच बाबा जोगिंदर सिंघ जी, रकबे वाले; बाबा केहर सिंघ जी, मढियां वाले; बाबा जोगा सिंघ जी, करनाल वाले; बाबा मेहर सिंघ जी, नबियाबाद वाले; स. जसपाल सिंघ जी, भैरो माजरा वाले; बाबा सरबजीत सिंघ जी, भल्ला फतेहगड साहिब; बाबा परमजीत सिंघ जी, महिलपूर वाले; बाबा नरिंदर सिंघ जी, लंगर साहिब वाले; बाबा बलविंदर सिंघ जी, कार सेवा वाले; बाबा गुरचरण सिंघ जी, भैरो माजरा वाले; बाबा भुपिंदर सिंघ जी, संगत पुरा वाले; बाबा सुखबीर सिंघ जी, कथाकार आणि गि. तेजबीर सिंघ जी, दमदमी टकसाल यांची उपस्थिती होती.
याशिवाय प्रशासकांचे सल्लागार स. जसवंत सिंघ जी बॉबी (दिल्ली), गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स. रविंदर सिंघ कपूर, सहायक अधीक्षक स. जयमल सिंघ ढिल्लो आणि स. बलविंदर सिंघ फौजी, पी.ए. स. परविंदर सिंघ वासरीकर यांच्यासह अन्य मान्यवर बैठकीत सहभागी झाले.
युवकांना गुरुघराशी जोडण्यावर एकमत
बैठकीमध्ये पंजाबसह देशातील विविध भागांमध्ये शीख समाजातील युवकांमध्ये वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या व्यसनाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. युवकांना या व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
युवापिढीला गुरुघराशी जोडून त्यांच्यामध्ये चांगले संस्कार, नैतिकता आणि सकारात्मक जीवनमूल्ये रुजविण्याबाबत संत-महापुरुषांनी विचारविनिमय केला. ‘हर घर गुरमत’ मिशनच्या माध्यमातून युवकांना व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करणे, धार्मिक मूल्यांची जाणीव निर्माण करणे आणि समाजात जनजागृती करणे, यासाठी एकमताने संकल्प करण्यात आला.
व्यसनमुक्त आणि संस्कारक्षम समाजनिर्मितीचा निर्धार
युवापिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी कुटुंब, धार्मिक संस्था आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. ‘हर घर गुरमत’ मिशनच्या माध्यमातून युवकांना योग्य दिशा देऊन व्यसनमुक्त आणि संस्कारक्षम समाजनिर्मितीसाठी कार्य करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.










