कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रघुराज महाराज समाधी परिसरात भक्तिमय वातावरण; श्रीकृष्णाच्या मुरलीच्या सुरांवर बालगोपालांसह भाविकांचा रासक्रीडेचा आनंद
मुल्हेर, ता. बागलाण (सटाणा) : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मुल्हेर येथील रघुराज महाराज समाधी परिसरात बालगोपाल कृष्ण रासक्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या महोत्सवासाठी मुल्हेरसह पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी उपस्थिती लावली. विशेषतः लहान बालगोपालांनी श्रीकृष्णाच्या मुरलीच्या सुरांवर रासक्रीडेचा आनंद घेतला.
महोत्सवानिमित्त मंदिर परिसर झेंडूच्या फुलांच्या माळा, रंगीबेरंगी फुगे आणि आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता. या सजावटीमुळे परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते. श्रीकृष्णाच्या भक्तिगीतांनी आणि भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. ‘कोणाचा तो… मुरली वाजवितो’ या भजनाच्या सुरांनी परिसर दुमदुमून गेला होता.
मंदिराच्या गाभाऱ्यातही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी भाविकांनी श्रीकृष्ण आणि रघुराज महाराज यांच्या मूर्तींचे दर्शन घेतले. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत महोत्सवाचा आनंद लुटला.
कोजागिरी पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात पार पडलेल्या या कृष्ण रासक्रीडा महोत्सवामुळे मुल्हेर परिसरात भक्तिमय आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. परंपरा, श्रद्धा आणि भक्ती यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या महोत्सवात पंचक्रोशीतील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.











