ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांना ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी रत्न पुरस्कार २०२६’ प्रदान
मुंबई कांदिवली पश्चिम : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त श्री रामलीला एज्युकेशन सोसायटीच्या वतीने नाशिक येथे आयोजित ‘अहिल्या रत्न पुरस्कार वितरण सोहळा’ उत्साहात पार पडला. रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आयटीआय सिग्नलजवळील नाईस सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मुंबईतील कांदिवली पश्चिम येथे राहणारे ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, गीतकार, सामाजिक कार्यकर्ते आणि धनगर समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भारत कवितके यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी रत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदना आणि शिववंदनेने झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. दामिनी जाधव यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित एकांकिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ काढण्यात आलेली सुंदर आणि सुबक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ही रांगोळी शीतल यांनी साकारली होती.
सोसायटीच्या शिल्पा ताईंनी प्रास्ताविक करताना, “विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याला बळ देण्यासाठी आम्ही हा पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे. सोसायटीचे विविध उपक्रम राबविताना अनेक अडचणी येतात,” असे सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे, हा या सोहळ्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिला पोलीस अधिकारी तेजस्वी आंबेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांचे कर्तृत्व, सायबर गुन्हे आणि डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर यावर प्रकाश टाकला. अठराव्या शतकात महिलांचे जीवन कठीण होते, असे नमूद करत कर्तृत्ववान महिलांना मिळणारा पुरस्कार त्यांना अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देतो, असे त्या म्हणाल्या. सोशल मीडियावर छायाचित्रे प्रसिद्ध करताना महिलांनी काळजी घ्यावी, सायबर गुन्ह्यांपासून सावध राहावे आणि बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. पालकांनी मुलांकडे लक्ष देऊन त्यांना व्यसनांपासून दूर ठेवावे, पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी किमान एक तरी झाड लावावे, असेही त्यांनी सांगितले.
दिनकर आण्णा पाटील यांनी समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देत, आपण समाजासाठी काय करतो आणि समाजाला काय देऊ शकतो, याचा प्रत्येकाने विचार करावा, असे आवाहन केले. पुरस्कार स्वीकारणाऱ्या व्यक्तींचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सायबर गुन्हे, धार्मिक व सामाजिक विषय, पर्यावरण संवर्धन, त्वचारोग, चित्रपटसृष्टी, राजकारण, मुलांचे संगोपन आणि सोशल मीडियाचा वापर करताना महिलांनी घ्यावयाची काळजी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. के. नागरे यांनी केले. सोसायटीचे पदाधिकारी रंगनाथ दुरगुडे, समाधान देवरे, रुपाली, तेजस्वी, अनिता ताई, मेटकरी आणि इतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणारा हा सोहळा प्रेरणादायी ठरला. भारत कवितके यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव झाला असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.











