‘ड्रग डिटेक्शन मशीन’द्वारे अवघ्या २ ते ३ मिनिटांत तपासणी; निकृष्ट औषधे पुरवणाऱ्या कंपन्यांवर होणार कठोर कारवाई
भुदरगड : : शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना सुरक्षित आणि दर्जेदार औषधे मिळावीत, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शासकीय रुग्णालयांमधील औषधांची गुणवत्ता जागेवरच तपासण्यासाठी राज्यात अत्याधुनिक ‘ड्रग डिटेक्शन मशीन’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
अमेरिकेतील ‘थर्मो सायंटिफिक’ कंपनीने विकसित केलेले हे यंत्र ‘रमण स्पेक्ट्रोस्कोपी’ या तंत्रज्ञानावर आधारित आहे. लेझर किरणांच्या साहाय्याने औषधांचे रासायनिक गुणधर्म तपासले जातात. त्यामुळे औषध अस्सल आहे की बनावट, याची प्राथमिक माहिती अवघ्या २ ते ३ मिनिटांत मिळू शकते. औषध योग्य असल्यास यंत्राच्या स्क्रीनवर ‘PASS’, तर निकृष्ट किंवा भेसळयुक्त असल्यास ‘FAIL’ असा संदेश दिसतो.
अशा प्रकारची अत्याधुनिक तपासणी यंत्रणा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात आठ मशीनची खरेदी
पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील आठ विभागांसाठी सुमारे १ कोटी २० लाख रुपये खर्चून आठ मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत. औषधांची अचानक तपासणी करण्यासाठी प्रत्येक विभागात दोन अधिकाऱ्यांचे विशेष भरारी पथकही तैनात करण्यात आले आहे. हे पथक कोणत्याही शासकीय रुग्णालयाला पूर्वसूचना न देता अचानक भेट देऊन औषधांचे नमुने जागेवरच तपासणार आहे.
निकृष्ट औषध पुरवठादारांवर कठोर कारवाई
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले की, रुग्णांच्या जिवाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. प्राथमिक तपासणीत औषध निकृष्ट किंवा बनावट आढळल्यास संबंधित नमुने अंतिम तपासणी अहवालासाठी तातडीने एनएबीएल (NABL) मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत पाठवले जातील. प्रयोगशाळेच्या अहवालात औषध निकृष्ट किंवा बनावट असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित औषध पुरवठादार कंपन्यांचे परवाने रद्द करण्यासह कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
या नवीन सुविधेमुळे शासकीय रुग्णालयांमधील औषधांच्या गुणवत्तेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येणार आहे. औषध पुरवठा प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यासह सर्वसामान्य रुग्णांना सुरक्षित आणि दर्जेदार औषधे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.











