१३ संचालकांचे बहुमत असल्याचा दावा करत शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड जाहीर; अधिकृत निवड प्रक्रियेवरून वाद
कोल्हापूर : हेमंत कांबळे : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्ष निवडीवरून गुरुवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. अधिकृत सभेसाठी आवश्यक कोरम (गणसंख्या) पूर्ण न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुढे न नेता सभा तहकूब केली.
दरम्यान, या निर्णयानंतर आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू समविचारी शेतकरी आघाडी’ने समांतर सभा घेतली. गोकुळच्या एकूण २५ संचालकांपैकी १३ संचालकांचे स्पष्ट बहुमत आपल्याकडे असल्याचा दावा करत आघाडीने शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली. संचालक अभिजित तायशेटे यांनी या निवडीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकृत अध्यक्ष निवडीची प्रक्रिया होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले असतानाही आघाडीने समांतर निवडीची घोषणा केली. यावर शशिकांत पाटील-चुयेकर यांनी आपली भूमिका मांडताना, “आमच्याकडे बहुमत असल्याने आमची ही अध्यक्ष निवड पूर्णपणे कायदेशीरच आहे,” असा दावा केला.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब करण्यात आल्याने आणि दुसरीकडे सतेज पाटील गटाकडून बहुमताच्या आधारे अध्यक्ष निवडीची घोषणा झाल्याने गोकुळमधील अध्यक्षपदाचा वाद अधिकच चर्चेत आला आहे. या निवडीची अधिकृत वैधता आणि पुढील प्रक्रिया याबाबत आता सहकार विभाग किंवा न्यायालयीन स्तरावर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










