विभागीय क्रीडा स्पर्धेत १५०० मीटर धावण्यात प्रथम क्रमांक; जव्हार तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
प्रतिनिधी / जव्हार : ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्येही मोठी प्रतिभा दडलेली असते, हे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, साकुर येथील विद्यार्थिनी कु. हर्षदा रमण राऊत हिने आपल्या उल्लेखनीय कामगिरीतून सिद्ध केले आहे. विभागीय क्रीडा स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.
कांदिवली येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत हर्षदा राऊत हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या या यशामुळे तिची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत असताना जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर हर्षदाने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या या कामगिरीमुळे शाळेसह जव्हार तालुका आणि पालघर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
हर्षदाला क्रीडा शिक्षक श्री. कुरकुटे सर, के. जी. सर आणि एन. सी. सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी. जे. वाघमारे यांच्या प्रोत्साहनासह सर्व शिक्षकवृंदाच्या सहकार्यामुळे तिला हे यश संपादन करता आले.
हर्षदाच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले असून, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.











