पाच निविदांच्या करारनाम्यांवर सह्या करण्यासाठी ४५ हजार ७८५ रुपयांची मागणी केल्याचा आरोप; संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
पिंपरी-चिंचवड, दि. २९ ऑक्टोबर : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील मुख्य अभियंता प्रमोद सुधाकर ओंभासे (वय ५७) यांच्याविरोधात ४५ हजार ७८५ रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागातील देखभाल, दुरुस्ती आणि नवीन पाइपलाइन टाकण्याच्या कामांसाठी मिळालेल्या पाच निविदांच्या करारनाम्यांवर सह्या करण्यासाठी निविदा रकमेच्या ०.५ टक्के प्रमाणे लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची पडताळणी करून पुढील कारवाई केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील एकूण ९१ लाख ५७ हजार ६८ रुपये किमतीची पाच कामे निविदेद्वारे मिळवली होती. या कामांचे कार्यादेश मिळाल्यानंतर महानगरपालिकेसोबत करारनामे करणे आवश्यक होते. त्यासाठी तक्रारदाराने करारनामे तयार करून कंपनीच्या वतीने सह्या केल्या आणि संबंधित फाइल अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंत्यांच्या सह्यांसाठी सादर केली होती.
तक्रारीनुसार, अधीक्षक अभियंता अजय सूर्यवंशी यांनी करारनाम्यांवर सह्या करण्यासाठी ४५ हजार ७८५ रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पाचपैकी तीन निविदांच्या फाइलवर सह्या करून त्या मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे पाठवण्यात आल्या.
तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पडताळणी
करारनाम्यांच्या फाइल प्रलंबित राहिल्याने तक्रारदाराने २९ मे २०२६ रोजी ओंभासे यांची भेट घेतली. त्या वेळी पाच निविदांच्या करारनाम्यांवर सह्या करण्यासाठी निविदा रकमेच्या ०.५ टक्के प्रमाणे ४५ हजार ७८५ रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यानंतर तक्रारदाराने ११ जून २०२६ रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्याच दिवशी विभागाकडून पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान ओंभासे यांच्या टेबलावर असलेल्या ३८ लाख रुपयांच्या तीन निविदांच्या फाइलसाठी १९ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती विभागाने दिली. यापूर्वीही तक्रारदाराकडून लाच स्वीकारल्याचे मान्य केल्याची माहिती विभागाच्या म्हणण्यानुसार समोर आली आहे.
संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७९/२०२६ दाखल करण्यात आला. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ मधील कलम ७ अन्वये प्रमोद ओंभासे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांना दुपारी ३ वाजता तपासासाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक नीता मिसाळ यांच्या पथकाने केली. पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांनी कारवाईचे पर्यवेक्षण केले. पोलीस अधीक्षक फिरोज सैयदखान आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.









