रामगड रस्त्यालगतच्या शेतातील प्रकार; शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान, पंचनामा करण्याची कार्यवाही
कर्की, ता. मुक्ताईनगर : कर्की शिवारातील रामगड रस्त्यालगत असलेल्या शेतात अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास केळीच्या बागेची नासधूस केल्याची घटना समोर आली आहे. शेतकरी दिगंबर कडू पाटील यांच्या शेतातील अंदाजे १०० केळीची झाडे कापून फेकून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तींनी हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मेहनतीने उभे केलेले केळीचे पीक डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी दिगंबर पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याची कार्यवाही केली.
शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची अशा प्रकारे नासधूस करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.









