पाच दिवस नामवंत वक्त्यांची व्याख्याने; समाजप्रबोधन, वाचनसंस्कृती, देशप्रेम, शौर्य आणि मानवी नातेसंबंधांवर होणार विचारमंथन
कुरुंदवाड | प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील नगरवाचनालयाच्या वतीने कै. एकनाथ तथा नाथा वासुदेव छत्रे (कुरुंदवाडकर) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच कै. पद्मश्री पां. वा. गाडगीळ आणि कै. डॉ. स. र. गाडगीळ यांच्या स्मरणार्थ शरद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर ते शनिवार, दि. २१ नोव्हेंबर या कालावधीत ही व्याख्यानमाला पार पडणार आहे. दररोज सायंकाळी ५.३० वाजता व्याख्यानांना प्रारंभ होणार असून विविध क्षेत्रांतील नामवंत वक्ते श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत.
पाच दिवसांत पाच मान्यवरांची व्याख्याने
मंगळवार, १७ नोव्हेंबर : व्याख्यानमालेचे पहिले पुष्प आटपाडी येथील निवृत्त प्राचार्य, उत्तम कवी, कथाकार व लेखक सुनील दबडे गुंफणार आहेत. ‘माणसात शोधूया देव’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.
बुधवार, १८ नोव्हेंबर : मुंबई येथील राष्ट्रपती शौर्यचक्र प्राप्त मेजर जनरल (निवृत्त) मधुसूदन सुर्वे यांचे ‘शौर्य व पराक्रमाचे आत्मकथन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. हे विशेष व्याख्यान कुरुंदवाड पालिका चौकात आयोजित करण्यात आले आहे.
गुरुवार, १९ नोव्हेंबर : मुरगूड येथील समाजशास्त्राचे अभ्यासक प्रा. पांडुरंग सारंग ‘वाचन, श्रवण हेच श्रेष्ठ जीवन’ या विषयावर विचार मांडणार आहेत.
शुक्रवार, २० नोव्हेंबर : बारामती येथील वैद्यकीय शिक्षणाबरोबरच पत्रकारिता, वाचन, लेखन आणि अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. दीपिका कोकरे ‘हरवत चाललेली नाती’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
शनिवार, २१ नोव्हेंबर : सांगली येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक सचिदानंद कानिटकर ‘हा देश माझा’ या विषयावर व्याख्यान देणार असून, त्यांच्या व्याख्यानाने शरद व्याख्यानमालेची सांगता होणार आहे.
मेजर जनरल मधुसूदन सुर्वे यांचे व्याख्यान वगळता अन्य सर्व व्याख्याने नगरवाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहेत. समाजप्रबोधन, वाचनसंस्कृती, देशप्रेम, शौर्य, मानवी नातेसंबंध अशा विविध विषयांची वैचारिक मेजवानी या व्याख्यानमालेतून रसिक श्रोत्यांना मिळणार आहे.
या व्याख्यानमालेचा शहर व परिसरातील रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन नगरवाचनालयाचे उपकार्याध्यक्ष प्रा. बी. डी. सावगावे, कार्याध्यक्ष अ. शा. दानवाडे आणि सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.











