सिमेंट मिक्सर ट्रक पलटी; अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या वाहनांना भरधाव ट्रकची धडक, २५ हून अधिक कारचे नुकसान
सुदैवाने जीवितहानी टळली; अनेक वाहनांचे मोठे नुकसान, अपघातस्थळी वाहतुकीचा खोळंबा
जालना | प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिवरखेड पूर्णा ते तढेगावदरम्यान चॅनल क्रमांक ३२१.९०० वरील पुलावर सिमेंट मिक्सिंग ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक बॅरिगेट्सला धडकून पलटी झाला. या अपघातानंतर घटनास्थळी थांबलेल्या वाहनांच्या रांगेला मागून आलेल्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे २५ हून अधिक कार एकमेकांवर आदळून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनांमध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
प्राप्त माहितीनुसार, इमरान अन्सारी मिराज अन्सारी (वय २४, रा. पनवेल) हा चालक अमरावती येथून मुंबईच्या दिशेने सिमेंट मिक्सिंग ट्रक घेऊन जात होता. शुक्रवारी सकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास हिवरखेड पूर्णा ते तढेगावदरम्यान चॅनल क्रमांक ३२१.९०० वरील पुलावर अचानक त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक महामार्गाच्या बाजूला असलेल्या बॅरिगेट्सला जोरदार धडक देऊन रस्त्यावर पलटी झाला. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीत खळबळ उडाली.
अपघात पाहण्यासाठी कारच्या लांबच लांब रांगा!
सिमेंट मिक्सिंग ट्रक पलटी झाल्यानंतर मागून येणाऱ्या काही कारची ट्रकला धडक बसली. दरम्यान, सोनोशी येथील गजानन नागरे हे पुण्याकडे जात असताना त्यांनी आपले वाहन थांबवून ट्रकचालकाला बाहेर काढण्यास मदत केली. अपघातामुळे ट्रकमधील सिमेंट रस्त्यावर विखुरले गेले होते. त्यामुळे परिसरात धूळ पसरून वाहनचालकांना दिसण्यात अडचण निर्माण झाली.
अपघातग्रस्त ट्रक बाजूला काढण्यासाठी आणि वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून मागून येणारी वाहने थांबविण्यात आली. त्याचवेळी अपघात नेमका कसा घडला, अपघातग्रस्तांना मदतीची गरज आहे का, हे पाहण्यासाठी तसेच उत्सुकतेपोटी अनेक कारचालकांनी आपली वाहने थांबवली. परिणामी अपघातस्थळाच्या परिसरात कारच्या लांबच लांब रांगा लागल्या. मात्र, हीच परिस्थिती पुढील मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरली.
भरधाव ट्रकची कारच्या रांगेला जोरदार धडक!
कारची रांग लागलेली असतानाच मागून वेगाने आलेल्या एका ट्रकने रांगेतील कारना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर हा ट्रक घटनास्थळावरून पसार झाला. या धडकेमुळे रांगेतील कार एकापाठोपाठ एक पुढील वाहनांवर आदळल्या. त्यामुळे अनेक कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या साखळी अपघातात २५ पेक्षा अधिक कारचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
काही कारचालक निघून गेल्याने नुकसानीचा आकडा अस्पष्ट!
या घटनाक्रमात काही कारचे मोठे नुकसान झाले, तर काही वाहनांना किरकोळ खरचटले. किरकोळ नुकसान झालेल्या काही कारचालकांनी घटनास्थळावरून पुढील प्रवास सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नेमक्या किती कारचे नुकसान झाले, याची निश्चित संख्या समोर आलेली नाही. संबंधित यंत्रणांच्या पाहणीनंतर नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पोलीस व आरोग्य विभागाची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील किरकोळ जखमींना वैद्यकीय उपचार देण्यात आले. सुदैवाने या संपूर्ण घटनाक्रमात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त ट्रक आणि कार महामार्गाच्या बाजूला हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेत एका बाजूने वाहतूक सुरू ठेवली.
अपघात पाहण्यासाठी वाहन थांबविणे ठरू शकते जीवघेणे!
समृद्धी महामार्गावरील या घटनाक्रमातून वाहनचालकांसाठी महत्त्वाचा धडा समोर आला आहे. महामार्गावर एखादा अपघात घडल्यास केवळ उत्सुकतेपोटी रस्त्यावर वाहन थांबवून अपघात पाहणे धोकादायक ठरू शकते. मदतीची भावना महत्त्वाची असली, तरी त्यासाठी वाहतुकीला अडथळा निर्माण न करता सुरक्षित अंतर राखणे आणि आपत्कालीन यंत्रणांना सहकार्य करणे आवश्यक आहे. अन्यथा एका अपघातातून अनेक वाहनांच्या अपघातांची साखळी निर्माण होऊन निष्पाप प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ शकतात.










