भाजी विक्रेत्यांकडून मुख्य रस्त्यावरच दुकाने; वाहतुकीचा खोळंबा, रुग्णवाहिकांनाही अडथळा
अतिक्रमण हटविण्याची मागणी; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी, सातारा
सातारा शहरातील शेतकरी भाजी मंडई ते राधिका रोड, मनाली हॉटेल, मार्केट यार्ड आणि खंडोबा मंदिर परिसरात भाजी विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिलेली असतानाही काही विक्रेत्यांकडून मुख्य रस्त्यावरच दुकाने थाटली जात असल्याने रस्त्याची निम्म्याहून अधिक जागा व्यापली जात आहे. परिणामी दररोज वाहतुकीचा खोळंबा होत असून नागरिकांसह रुग्णवाहिकांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
या परिसरात दररोज शेकडो शेतकरी आणि भाजी विक्रेते व्यवसायासाठी येतात. नगरपरिषदेने विक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिलेली असतानाही काही विक्रेते निर्धारित जागेचा वापर न करता थेट मुख्य रस्त्यावर भाजीपाला विक्रीसाठी मांडत आहेत. त्यामुळे रस्त्याची उपलब्ध रुंदी कमी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
अनेकदा १५ ते २० मिनिटे वाहतूक ठप्प होत असल्याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या परिसरात मोठी रुग्णालये असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. एखाद्या रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करायचे असल्यास रुग्णवाहिकेलाही या गर्दीतून मार्ग काढणे जिकिरीचे ठरत आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ वाहतुकीपुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेशीही संबंधित बनला आहे.
या गंभीर समस्येकडे सातारा नगरपरिषदेचे लक्ष वेधण्यासाठी माजी सभापती राम हादगे यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून भाजी विक्रेत्यांना निर्धारित जागेत व्यवसाय करण्यास सांगावे आणि परिसरातील वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.











