एकरी ८ ते १० क्विंटलऐवजी यंदा केवळ २ ते ३ क्विंटल कापूस; अग्रीम अनुदान आणि पीकविमा तातडीने देण्याची शेतकऱ्यांची मागणी
तेल्हारा | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील पिवंदळ बु. परिसरासह निंभोरा बु., निंभोरा खुर्द, तळेगाव, बाभूळगाव आणि वडगाव रोठे या भागांतील कापसाचा हंगाम यंदा नेहमीपेक्षा खूपच लवकर संपुष्टात आला आहे. दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणारा कापूस हंगाम यंदा अपुऱ्या पावसामुळे नोव्हेंबरमध्येच संपत आला आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनात मोठी घट झाली असून, लागवडीसाठी केलेला खर्चही वाया जाण्याची वेळ आली आहे.
यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. हंगामाच्या सुरुवातीला झालेला पाऊसही पुरेसा नव्हता. त्यामुळे कापूस पिकाची अपेक्षित वाढ होऊ शकली नाही. दरवर्षी एकरी ८ ते १० क्विंटल कापसाचे उत्पादन मिळत असताना यंदा मात्र एकरी केवळ २ ते ३ क्विंटल उत्पादन झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
उत्पादनात झालेल्या या मोठ्या घटीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करताना, “यावर्षी कापसाचे उत्पादन झाले नाही. आता सरकारने तरी आम्हाला तारावे. अग्रीम अनुदान आणि पीकविम्याची रक्कम लवकरात लवकर द्यावी,” अशी मागणी केली आहे.
पिवंदळ बु. परिसरात कापसाचा हंगाम संपत आला असला, तरी शेतकऱ्यांच्या अडचणी मात्र कायम आहेत. पाण्याची टंचाई, कापसाला मिळणारा भाव आणि कर्जाचा वाढता भार अशा तिहेरी संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
कापूस उत्पादनातील घट लक्षात घेता प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अग्रीम अनुदान व पीकविमा तातडीने उपलब्ध करून देऊन आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.










