दोन मालवाहू वाहनांसह १३.२० लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मंगरूळपीर | प्रतिनिधी
गुरांची मालवाहू वाहनांमध्ये निर्दयीपणे कोंबून वाहतूक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. मंगरूळपीर-वाशिम मार्गावरील कळंबा फाटा येथे १४ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दोन मालवाहू वाहनांमधून कोंबून नेण्यात येणाऱ्या आठ बैलांची पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत दोन्ही वाहनांसह एकूण १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मंगरूळपीर ते वाशिम मार्गावरून दोन वाहनांमध्ये गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कळंबा फाटा येथे सापळा रचून एमएच ३७ टी १९६२ आणि एमएच ०३ सीपी ५८८५ क्रमांकाची वाहने अडवून तपासणी केली.
तपासणीदरम्यान दोन्ही वाहनांमध्ये आठ बैल निर्दयीपणे कोंबून ठेवल्याचे आढळून आले. वाहतुकीदरम्यान जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था नसल्याचेही निदर्शनास आले. आवश्यक कागदपत्रांशिवाय ही वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
या प्रकरणी मोहम्मद फैजान मोहम्मद जावेद (वय २८, रा. दर्गा चौक, बढाईपुरा, मंगरूळपीर) आणि जावेद अहमद अब्दुल रऊफ (वय ४५, रा. टेकळीपुरा, मंगरूळपीर) या दोघांविरुद्ध आसेगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.









